जगासाठी जरी ते बापूरावजी लेले होते पण माझ्यासाठी ते माझे बापू आजोबा। आता म्हणाल हे कुठले तुझे आजोबा, तर हे माझ्या आईचे मोठे काका। माझा आणि बापू आजोबांचा सहवास फारच थोडका आहे याची महत्वाची कारणे म्हणजे आमच्या वयातील अंतर आणि त्यांचे नाशिक हुन बरेच लांब असलेले दिल्लीतील वास्तव्य। आता सारखे, मनात आलं की विमान पकडून पोचलो अशी त्यावेळची परिस्थिती नव्हती मला हे बोलताना खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय, पण खरच माझं बालपण हे खूप वेगळ्या काळात होतं असं नेहमी वाटतं।
बापू आजोबा आज आपल्यात असते तर गमतीने सांगायचे तर पंचवीस वर्षांचे झाले असते, कारण त्यांचा जन्म हा 29 फेब्रुवारीचा त्यामुळे 4 वर्षातून एकदा वाढदिवस। माझ्यासाठी या वर्षीचा फेब्रुवारी महिना हा बऱ्याच छोट्या छोट्या आठवणी जाग्या करणारा आहे। म्हणूनच मी आणि नमिताने चेन्नई हुन दिल्ली दर्शन करण्यासाठी हा आठवडा ठरवला। आता आपल्यातील सुजाण नागरिकांना माहिती असेलच की दिल्ली मधली परिस्थिती बरीच चिंताजनक आहे। आणि त्यामुळे मनात विचार आला होताच की या सगळ्या गोंधळात आमची दिल्ली वारी चुकते की काय। पण तसे काही झाले नाही आणि आम्ही दोघे येथे सुखरूप पोहोचलो।
आधी म्हणलं तसं माझ्या आणि त्यांच्या वयात जवळपास 70 वर्षांचं अंतर त्यामुळे त्यांची पत्रकारिता किंवा त्याचे प्रचारक म्हणून केलेले कार्य हे दोन्ही मी कधीच जवळून पाहिले नाही। माझ्यासाठी ते माझे आजोबा होते, मला हे पण म्हणता येईल की मी त्यांचा लाडका होतो। मला आठवतं की आम्ही 15 ते 20 जणं हरिद्वार - ऋषीकेश ला गेलो होतो तेव्हा आजोबांकडे उतरलो होतो आणि मला भेंडीची भाजी आवडते हे माहिती असल्याने त्यांनी ती त्यांच्या परिचरिकेला सांगून करून ठेवली होती। एव्हढा विचार एखादा गृहस्थाश्रमी पण नाही करणार पण तो बापू आजोबांनी केला, म्हणजे मी 6-7 वर्षांचा होतो त्यावेळी। आता त्यांच्यातला हा गुण मला उमगला, पण त्या तिसरीतल्या परीक्षितला हे आपले आजोबा लाड करतायत असच वाटलं होतं। कळायला लागल्यावरची ही पहिली आठवण बापू आजोबांची।
दुसरी भेट होती ती 1999 साली, माझ्या उन्हाळी सुटीत आई बाबा आणि मी असे तिघे बापू आजोबां बरोबर 2 आठवडे राहिलो। त्या वेळी त्यांना खूप त्रास होत होता उन्हाळ्याचा आणि वया प्रमाणे आलेल्या थकव्याचा। त्यांना डायबेटीस होता आणि त्यामुळे खाण्यात पथ्य, पण गोड तर खूप आवडीचं। तर बापू आजोबांना स्वतःला खायचे नाही म्हणून ते मला रोज आईस्क्रिमची आठवण करून देणार। पुन्हा नातवाला खाताना पाहून सुखावलेले आजोबा आता डोळ्यासमोर येतात, तेव्हा न कळलेले आजोबा आता कळतायत।
तिसरी भेट ही तशी लगेच झाली आणि ती बापू आजोबांच्या कार्याची पावतीच म्हणायला हवी। या वेळी दिल्लीला येण्याचे कारण होते बापुरावलेले यांच्या सत्कार समारंभाला हजेरी लावण्यासाठी। तो सत्कार होता बापूराव लेल्यांचा माझ्या बापू आजोबांचा नाही। हे असे मी म्हणतोय कारण या कार्यक्रमात मला पत्रकार बापूराव लेले यांचे दर्शन झाले आणि तेही पहिल्यादा। हा सत्कार होता त्या वेळचे आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते आणि प्रमुख अतिथी म्हणून आले होते लाल कृष्ण अडवाणी। आजोबांचा जनसंपर्क या कार्यक्रमामुळे आम्हा नातवंडांना कळला। या कार्यक्रमात जवळपास सगळे त्या वेळचे मंत्री हजर होते। ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असली तरी बापू आजोबांना या सगळ्यात फारसा रस नसावा असे मला वाटते कारण निस्वार्थीपणे पूर्ण आयुष्य ज्यांनी देशाला दिलं ते एका सत्काराला महत्त्व देतील असे मला वाटत नाही।
2020 हे बापू आजोबांच शतक पुर्ती वर्ष आहे आणि 29 फेब्रुवारी हा त्यांचा वाढदिवस, आज ठरवल्या प्रमाणे आम्ही दिल्लीत आहोत। D62, काका नगर, डॉ झाकीर हुसेन मार्ग जिथे त्यांच अनेक वर्ष वास्तव्य होतं तिथे आज आम्ही जाऊन आलो। सुदैवाने आम्हाला त्याच घरात राहात असलेल्या बाईंनी आतून घर बघण्याची परवानगी दिली। आम्ही त्यांना भेटून सगळं सांगितल्यावर त्यांना खूप आश्चर्य वाटलं कारण सध्याच्या धावपळीच्या युगात बालपणीच्या आठवणी पुन्हा अनुभवायला जमत नाही, त्यांना देखील त्यांची एक आठवण सांगावीशी वाटली। आज पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले।
Great work done by you both congrats
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteMasta
ReplyDeleteGreat Parikshit !!
ReplyDeleteNicely written.. U made everyone truly nostalgic in Bapumama's memories..
Masta ...
ReplyDelete