इतकी वर्ष उलटली तरी आठवते आणि सगळं डोळ्यासमोर काल परवाच झाल्यासारखे वाटते ते मी मस्कत ला गेलो तेव्हाचा आईचा चिंताक्रांत झालेला चेहरा,आईबाबा दोघेही मला विमानतळावर सोडायला आलेले.बाबा होते खमके पण त्यांच्या पण मनात असणारच हा प्रश्न की माझे कसे होईल. मी तसं फार कधी मान्य नाही करत पण घरात शेंडेफळ असल्याकारणाने माझे नेहमीच लाड व्हायचे आई, आजी,बाबा,दादा मग सायली आल्यावर ती पण त्या पंगतीत समाविष्ट.त्यामुळे सगळ्यांची चिंता ही की माझं कसं होणार?
पहिली नोकरी आणि त्यात ती ओमान सारख्या मुस्लिम देशात सगळेच नवीन अनुभव आणि त्याला जोडून असलेली धर्मांतराची भिती. आमच्या घरातील वातावरण तसं पुढारलेलं माझी आजी तर स्वतःच आमच्या बरोबरीने अंडी खाणारी, पण खाणं एकवेळ समजू शकतो पण धर्मांतरण हे माझ्या घरी देखील खपवून घेतलं नसतं कोणी. ही सगळी चिंता दूर करणारा माझा "ओमान चा दादा - अब्दुल". माझी आणि अब्दुल ची मैत्री तशी कामानिमित्त झाली आणि मग ती वाढत गेली इतकी की मी त्यांच्या घरातील एक सदस्य होऊन गेलो. मी त्याला ओमान चा दादा हे नाव ठेवलेलं फक्त घरीच माहिती आहे, हे त्याला देखील कधी सांगितले नाही.
अब्दुल मूळचा पाकिस्तानी पण जन्माने ओमानी आहे याचे कारण, एकोणाविसशेसाठच्या दशकाच्या अखेरीस अब्दुलच्या वडिलांची नेमणूक ओमानच्या सुलतानचे प्रमुख सल्लागार म्हणून झाली, आणि काही वर्षांनी ही सगळी लाहोरची पंजाबी बसरा मंडळी ओमानी झाली. सुलतानचे सल्लागार म्हणून देशात नावलौकिक होताच आणि अनेक मोठ्या माणसांशी ओळखी होत्या. (हल्लीच्या भाषेत सांगायचे तर वट होती त्यांची.) हे सगळे असूनदेखील कधीही त्या गोष्टीची घमेंड दिसली नाही, त्या ओळखीचा कधी गैरवापर केलेला माझ्यातरी पाहण्यात नाही. आता कित्येक वर्ष ओमान मध्ये वास्तव्य असून देखील त्यांची सगळ्यांचीच पाकिस्तानशी नाळ जोडलेली आहे, आपल्या संस्कृतीचेच ते वेगळेपण आहे की माणूस कितीही दूर गेला तरी भारतीयता त्याच्यातून जात नाही. काळानुसार थोडे बदल झाले आहेत पण तरी भाषा, रिती, पद्धती या सगळ्या पटकन नाही बदलत. लाहोरशी अजूनही सगळ्याच बसरा मंडळींचा संबंध आहे आणि हा अजून दृढ व्हावा या हेतूने असावे अब्दुलच्या वडिलांनी त्याला लाहोर ला शिकायला ठेवले होते. कॉम्पुटर ग्राफिक्स शिकलेला अब्दुल आणि ज्याला कॉम्पुटर वापरता तर येतो पण त्यातल्या टेक्निकल गोष्टी यत्किंचितही कळत नसलेला असा मी कसे मित्र झालो याचे कारण कळत नाही.
आमची पहिली भेट Shell च्या कॅन्टीन मधली, टिपिकल ओमानी डिशडाशा घातलेला उंच पंजाबी बांधा असलेला एक माणूस डोळ्याला चष्मा आणि डोक्यावर ओमानी टोपी घातलेला चक्क हिंदीत बोलतोय हे बघून आश्चर्यच वाटले. तसं ओमानी हिंदी बोलतात हे मला नवीन नव्हतं कारण मी रुवीमध्ये (मस्कत मधील एक भाग जिथे माझे वास्तव्य होते) सगळीकडे हिंदीच ऐकले होते, पण ऑफिस मध्ये अजूनतरी ऐकलं नव्हतं काही ठराविक भारतीय आणि पाकिस्तानी होते पण त्यापलीकडे हिंदी नाही. तसा अब्दुल मला नवीन नव्हता. कामासाठी आमचे बोलणे व्हायचे पण ते इंग्लिश मध्ये, Shell च्या ऑफिस मध्ये ओमानी डिशडाशा आणि हिंदी हे जरा अजब कॉम्बिनेशन वाटलं. इंग्लिश शाळेतून शिकलेला मी पण हिंदी, मराठी म्हणजे कंफर्ट झोन त्यामुळे का कुणास ठाऊक मी त्या अब्दुल वाल्या लंच ग्रुप मध्ये शिरलो. बाकी फरक कितीही असले तरी दोन आवडी एक सारख्या होत्या एक म्हणजे फुटबॉल (टीव्ही समोर पाय पसरून मॅच बघणे) आणि सिनेमा आणि या दोन्ही गोष्टींमध्ये पंजाबी दिलदार पणा खूप अनुभवला. बाकी कशात रस न घेणारा अब्दुल फूटबॉलची मॅच म्हणलं की कधीही तयार मग ते कितीही वाजता, आत्ता कशाला, फर्स्ट हाफ बघू मग मला झोपायचे आहे, ही असली मिळमिळीत कारणं कधीच नाही.
असाच एकदा फूटबॉलची मॅच बघायला गेलेलो असता माझी काकुंची आणि सादिया भाभिंची भेट झाली, त्याआधी अब्दूलने काकूंना माझ्याबद्दल सांगितले होतोच, कारण त्या माझ्यासाठी घरचं जेवण पाठवायच्या. असे लाड नातेवाईक पण करणार नाहीत असे न भेटलेल्या माझ्यासारख्या एका मुलाचे होत होते. पहिल्यांदा भेटल्यावरच काकूंना नमस्कार केला आणि त्यांना म्हणालो की आंटी आपने खाना भेजा था उसकेलिये thankyou तर एकदम त्यांना भरूनच आले. मला म्हणाल्या अब्दुल का दोस्त है तू तो तू भी मेरे बेटे जैसा है. त्या भेटी नंतर माझे त्यांच्याकडे बऱ्याचदा जाणं झालं. नेहमी गेलो की काकूंनी काहीतरी भन्नाट बनवलेलं खायला मी असायचोच. अब्दुलपेक्षा माझेच लाड जास्ती होतायत असे वाटू लागायचे. २०१७ साली जेव्हा आई, बाबा, दादा, सायली आणि स्पृहा मस्कत ला आले होते तेव्हा तर अब्दुलने आणि बाकी बसरा मंडळींनी केलेले आदरातिथ्य सगळ्यांना एक सुखद धक्का देऊन गेलं. घरी सगळ्यांना माहिती होतीच बसरा फॅमिलीची पण स्वतः अनुभव घेतला सगळ्यांनी, काकूंना पण खूप आनंद झाला होता तो सगळा उत्साह आणि आनंद त्यांच्या व्यवहारात दिसत होता.
माझे लग्न ठरल्याचे कळवले आणि पत्रिका देण्यासाठी म्हणून जेव्हा काकूंना भेटलो तेव्हा तर त्यांचा हिरमोड झाला कारण लग्नाला यायची कितीही ईच्छा असली तरी देखील येता येऊ शकत नव्हत्या,विसा(visa) मिळणार नाही हे नक्की होते कारण ओमानी असून देखील मूळ पाकिस्तान,अशक्य नसलं तरी खूप खटाटोप असतो त्या सगळ्याचा आणि एकदा का तुम्ही भारतात गेला आहात हे पासपोर्ट वर दिसलं की पाकिस्तान ला जायचे वांदे होणार हे काही नवीन सांगायला नको. एप्रिल २०१८ साली परत यायच्या आधी आम्ही बरेच फिरलो ज्या गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या त्या सगळ्या नाही झाल्या पण जेवढा वेळ होता त्यात समाधान मानले आम्ही. परत यायच्या दिवशी मस्कत विमानतळावर हा माझा ओमान चा दादा मला सोडायला आला होता. खूप दिलं या बसरा फॅमिलीने, न मागता एक दादा मिळाला, खूप लाड करणाऱ्या काकू मिळाल्या, एक वाहिनी मिळाली आणि तिकडे देखील छोटीशी स्पृहा होतीच तिचे नाव हिबा.
या सगळ्यांची परत भेट कधी होईल का नाही या विचारतच मी आणि नमिता मे २०१८ ला चेन्नईला स्थायीक झालो, आणि माझे भाग्य म्हणून पुन्हा एकदा ओमान ला जायची संधी मिळाली. या वेळी मात्र हे वास्तव्य फक्त १५ दिवसांचे होते. आम्ही ६ ऑक्टोबर २०१९ ला पोचलो तेव्हा पुन्हा अब्दुल आम्हाला मस्कत विमानतळावर न्यायला आला होता आणि या वेळी काकूंना नमिता पण भेटणार होती.
No comments:
Post a Comment